श्री गायत्री मातेची आरती
जय देवी जय देवी गायत्री माते ।
सद्भावे ओवाळू जय प्रणवातीते। जय देवी जय देवी ॥धृ॥
अनादी अनंत अतर्क्य माये तव लीला ।
स्वेच्छेने उपजविले विधी हरि शंभुला ।
विधी सृजी जग हरी पोषी हर संहाराला ।
प्रेरिसी योगमाये न कळे कवणाला ॥ १ ॥
पांचामुखी पंचतत्वे निर्मियली ।
पंचीकरणे विविध सृष्टी रचियेली ।
अहंभावे तया स्फुरवूनि कृति केली ।
माते तुज न स्तविती त्यांची मती भ्रमली ||२||
गाता तुज तरति म्हणूनि गायत्री नाव ।
भुक्ति मुक्ति साधती न भव भया ठाव ।
सत्वातीता ब्रह्मरूपिणी हा भाव ।
धरिती जे ज्ञाने त्या नच दुःखा वाव ॥३॥
आदिमाये तूते विसरले लोक ।
धर्महानि होईल पडला हा धाक ।
ग्रासुनि दैन्य भ्रमुनि नुरला विवेक ।
स्मरता तुजला अनुदिनी सकलही हो पाक ॥४॥
त्रिनेत्र पंचशिरे चंद्रकला मुकुटाते ।
वरदाभय चक्र गदा कपाल शंखाते ।
द्विपद्म अंकुश कश कर कमलासनास्थिते ।
मोह निवारुनी माते उद्धरी आम्हाते || ५ ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: