|| श्रीगुरुपादुकाष्टकम् ||
Shree Guru Padukashtam
ज्या संगतीनेंच विराग झाला । मनोदरींचा जडभास गेला ।
साक्षात परमात्मा मज भेटविला । विसरू कसा मी गुरुपादुकांला ।।१।।
सद्योगपंथें घरि आणियेलें । अंगेच मातें परब्रह्म केलें ।
प्रचंड तो बोधरवि उदेला । विसरुं कसा मी गुरुपादुकाला ||२||
चराचरीं व्यापकता जयाची । अखंड भेटी मजला तयाची ।
परं पदीं संगम पूर्ण झाला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ।।३।।
जो सर्वदा गुप्त जनांत वागे । प्रसंन्न भक्ता निजबोध सांगे ।
सद्भक्तिभावांकरितां भुकेला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ।।४।।
अनंत माझे अपराध कोटी । नाणी मनीं घालुनि सर्व पोटीं ।
प्रबोध करितां श्रम फार झाला । विसरुं कसा मी गुरुपादुकाला ||५||
कांही मला सेवनही न झालें । तथापि तेणें मज उद्धरीलें ।
आता तरी अर्पिन प्राण त्याला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ।।६।।
माझा अहंभाव वसे शरीरीं । तथापि तो सद्गुरु अंगिकारीं ।
नाहीं मनीं अल्प विकार ज्याला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ।।७।।
आतां कसा हा उपकार फेडूं । हा देह ओवाळुनि दूर सांडूं ।
म्यां एकभावें प्रणिपात केला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥८ ॥
जया वानितां वानितां वेदवाणी । म्हणे ' नेति नेतीति' लाजे दुरुनी ।
नव्हे अंत ना पार ज्याच्या रुपाला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ।। ९ ।।
जो साधुचा अंकित जीव झाला । त्याचा असे भार निरंजनाला ।
नारायणाचा भ्रम दूर केला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ।।१०।। ।।
इति गुरुपादुकाष्टक संपूर्ण ।।
श्री गुरुदेव दत्त
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: