Shree Swami Samarth Manspuja मानसपूजा

 मानसपूजा


नमो स्वामिराजं दत्तावतारम् । श्रीविष्णु ब्रह्मा शिवशक्तिरुपम् । 

ब्रह्मस्वरुपाय करुणाकराय । स्वामी समर्थाय नमो नमस्ते ॥१॥ 

हे स्वामि दत्तात्रया हे कृपाळा । मला ध्यानमूर्ती दिसू देई डोळा । 

कुठे मया माझी म्हणे बाळ जैसा । समर्था तुम्हावीण हो जीव तैसा ॥२॥ 

स्वामी समर्था तुम्ही स्मर्तृगामी । हृदयासनी या बसा प्रार्थितो मी । 

पुजेचे यथासांग साहित्य केले । मखरांत स्वामी गुरु बैसविले ॥३॥ 

महाशक्ती येथे उभ्या ठाकताती । जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती ।

असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ । परब्रह्म साक्षात् गुरुदेव दत्त ||४|| 

सुवर्ण ताटी महारत्न ज्योती । ओवाळुनी अक्षता लावू मोती । 

शुभारंभ ऐसा करुन पुजेला । चरणांवरी ठेवू या मस्तकाला ॥५॥ 

हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा । तुझी पाद्यपूजा करी बाळ तूझा । 

प्रणिपात साष्टांग शरणांगताचा । तुम्हा वाहिला भार या जीवनाचा ॥६॥

ही ब्रह्मपूजा महाविष्णुपूजा । शिवशंकराची असे शक्तिपुजा । 

दही दूध शुद्धोदकाने तायाला । पंचामृत स्नान घालू प्रभूला ॥७॥ 

वीणा तुताऱ्या किती वाजताती । शंखादि वाद्ये पहा गर्जताती ।

म्हणती नगारे गुरुदेव दत्त | श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ ॥८ ॥ 

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली । श्री दत्त स्वामिंसी या स्नान घाली । 

महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया । महिमा तयांचा कळेना जगा या ॥ ९ ॥ 

मी धन्य झालो हे तीर्थ घेता । घडू दे पुजा ही यथासांग आता । 

आजानुबाहू दिव्य कांती सतेज । नसे मानवी देह हा स्वामीराज ॥१०॥ 

प्रत्यक्ष श्रीसद्गुरु दत्तराज । तया घालुया रेशमी वस्त्रसाज । 

सुगंधीत भाळी टिळा रेखियला । शिरी हा जरी-टोप शोभे तयाला ।। ११।। 

वक्षःस्थळी लाविल्या चंदनाचा । सुवास तो वाढवी भाव साचा ।

शिरी वाहुया बिल्व तुलसी दलाते । गुलाब जाई-जुई अत्तराते || १२ || 

गंधाक्षता वाहुनिया पदांला । ही अर्पूया जीवन पुष्पमाला । 

चरणी करांनी मिठी मारु देई । म्हणे लेकरासी सांभाळ आई ||१३|| 

इथे लावुया केशर कस्तुरीचा । सुगंधात हा धूप नाना प्रतीचा । 

पुष्पांजली ही तुम्हां अर्पियेली | गगनांतुनी पुष्पवृष्टी जहाली || १४ || 

करुणावतारी अवधूत किर्ती । दयेची कृपेचीच ही शुद्ध मूर्ती । 

प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची । अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची ।। १५ । 

हृन्मंदिरीची ही स्नेहज्योती । मला दाखवी सामिची योगमूर्ती ।

करु आरती आर्त भावे प्रभूंची । गुरुदेव श्रीस्वामी दत्तात्रयांची ।। १६ ।।

पंचारती ही असे पंचप्राण | ओवाळुनी ठेवू चरणांवरुन ।

निघेना पुढे शब्द बोलू मी तोही । मनीचे तुम्ही जाणता सर्व काही ॥१७॥ 

हे स्वामीराजा बसा भोजनाला । हा पंचपक्वान्न नैवेद्य केला । 

पुरणाची पोळी तुहा आवडीची । लाडू करंजी असे ही खव्याची ॥ १८ ॥

डीळींब द्राक्षे फळे आणि मेवा । हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा ।

पुढे हात केला या लेकराने । प्रसाद द्यावा अपुल्या कराने ।। १९ ।। 

तांबूल घ्यावा स्वामी समर्था । चरणाची सेवा करु द्यावी आता ।

प्रसन्नेतून मागी मी काय । हृदयी ठेव माते तुझे दोन्ही पाय || २० || 

सर्वस्व हा जीव चरणी ठेवू । दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ । 

नको दूर लोटू अपुल्या मुलासी । कृपा छत्र तुमचेच या बालकासी ।। २१ ।। 

धरु दे आता घट्ट तुझ्या पदाला । पदी ठेवू दे शीर शरणांगताला । 

हृदयी भाव यावे असे तळमळीचे । करी पूर्ण कल्याण जे या जिवांचे ॥ २२ ॥ 

तुझे बाळ पाही तुझी वाट देवा । नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा । 

मनी पूजनाची असे दिव्य ठेव । वसो माझिया अंतरी स्वामी देव || २३ || 

॥ श्री गुरुदेव दत्त ।  । श्रीस्वामी समर्थ महाराज की जय ॥

Shree Swami Samarth Manspuja मानसपूजा Shree Swami Samarth Manspuja मानसपूजा Reviewed by General Information on ऑगस्ट २८, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.